‘के दिल अभी भरा नहीं’ नाटकाच्या नाट्यानुभवाविषयी

विक्रम गोखले आणि रीमा लागू यांनी एके काळी गाजवलेलं ‘के दिल अभी भरा नहीं’ हे नाटक दिग्दर्शक, अभिनेते मंगेश कदम पुनश्च रंगभूमीवर घेऊन आले आहेत.
विक्रम गोखले आणि रीमा लागू यांनी एके काळी गाजवलेलं ‘के दिल अभी भरा नहीं’ हे नाटक पुनश्च रंगभूमीवर घेऊन आले आहेत दिग्दर्शक मंगेश कदम. दिग्दर्शक मंगेश कदम यांचं यशस्वी दिग्दर्शन आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. सध्या गाजत असलेली, प्रत्येक नाटय़प्रेमीच्या ओठावर असलेली रंगभूमीवरचीच कलाकृती म्हणजे ‘गोष्ट तशी गमतीची’. या नाटकातही प्रेक्षकांनी मंगेश कदम आणि लीना भागवत यांची केमिस्ट्री उचलून धरली. तीच नात्याची गम्मत याही नाटकात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

या नाटकातून लेखक शेखर ढवळीकर यांनी प्रत्येकाच्या घरातली गोष्ट प्रेक्षकांच्या समोर ठेवलेली आहे. अरुण (मंगेश कदम) आणि वंदना (लीना भागवत) या जोडप्यात शेवटपर्यंत प्रेक्षक स्वतला शोधत राहतो. माणसाच्या मनात सुखी संसाराच्या कल्पना नेहमीच वेगवेगळ्या असतात. पोटाची खळगी भरणं हे संसारातलं प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य. आधी दोघांचं असणारं कुटुंब तिघा- चौघांचं होतं आणि मग खाणारी तोंडं अधिक आणि कमावणारे हात कमी हे गुणोत्तर प्रत्येकाच्याच वाटय़ाला येतं. मग हे दांपत्य आíथक उलाढालीना सामोरं जाण्याकरिता आíथक व्यवस्थापनाच्या मागे लागतं. त्यात कधीकधी सगळेच आíथक निर्णय हे ‘कर्ता’ पुरुष घेतो आणि मुलांच्या भवितव्याची जबाबदारी ‘स्त्री’वर सोपवली जाते. दोघेही आपापल्या जबाबदाऱ्या सचोटीने पार पाडत असतात, पण एकेकटेच. संसार दोघांचा असतो हे विसरून. कालांतराने मुलांच्या पंखात बळ येतं आणि मुलं आपल्या मार्गाने निघून जातात. मग संसारातली ही दोनच पात्रं पुन्हा उरतात. आíथक गुंतवणूक करता करता भावनिक गुंतवणूक करायला विसरलेलं हे जोडपं पुन्हा आपापले रस्ते शोधायचा प्रयत्न करतात; पण ते रस्तेही आपापले नसतात. उतारवयातील सहजीवन नकोसं होणार की काय याची भीती जोडप्याच्या मनात घोळू लागते. खरंतर हा उतारवयातील काळ सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यामुळे फक्त दोघांसाठीच असणारा सुवर्णकाळ; पण दुर्दैवाने आठवणींचं अकाउंटच उभरत्या काळात उघडलेलं नसल्यामुळे त्यावर इंटरेस्टही बसत नाही त्यामुळे नातं उपभोगताही येत नाही. असं असताना नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी हे ‘कारखानीस’ या पात्राद्वारे या दोघांमधल्या दुवा सांधणाऱ्या एका समदु:खी माणसाची व्यक्तिरेखा साकारतात आणि नातं टिकवून ठेवायचं असेल तर ‘एकमेकांशी बोला आणि खरं बोला’ असा सल्ला देतात. नाटक पुन्हा फेर धरू लागतं. आता मात्र दोघंही एकमेकांना एकमेकांचे दोष न दाखवता संवाद कसा साधायचा यावर विचार करायला लागतात आणि त्यांच्या नकळत एकमेकांना हवेहवेसे वाटायला लागतात.
आजच्या काळातला आíथक व्यवहार हा फक्त पुरुषाच्या हातात नाही कारण आज स्त्रीही कर्ती झालेली आहे. रोजच्या गरजा भागवण्यासाठी संसारातील दोघांनाही घरचा उंबरठा ओलांडणं भाग आहे. जेव्हा दिवसाच्या शेवटच्या प्रहरी परत दोघांना आपलं घर दिसतं तेव्हा कुठल्याही भावनिक गरजेपेक्षा ‘झोप’ किंवा ‘आराम’ ही गरज जास्त महत्त्वाची वाटते आणि उतारवयात संसाराची गाडी ‘नको असलेल्या रहाटगाडय़ावर’ येऊन थांबते. नवरा आणि बायको हे इतकं सुंदर नातं आपण आíथक व्यवहारात गुंतवतो आणि नातं जपायला विसरून जातो. यावरचं भाष्य करणारं हे नाटक.
एक दिग्दर्शक म्हणून या नाटकाकडे तुम्ही कसे पाहता याचं उत्तर देताना मंगेश कदम, ‘आजच्या तरुण पिढीसाठीचं हे नाटक आहे’, असं म्हणतात. त्यांच्या मते आजची तरुण पिढी ही सशक्त आहे, सहनशील आहे, धाडसी आहे; पण त्याचबरोबर पॅ्रक्टिकल आहे. भावनिक गुंतवणूक या पिढीला रुचत नाही. त्यामुळे त्यांनी हे नाटक नक्की पहावं असं त्यांचं मत आहे. एकूणच समाज आज तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे माणूसपण विसरत चालला आहे. लीना भागवत यांच्या मते ‘‘घटस्फोट हा शब्द जोपर्यंत प्रचलित नव्हता तोवर नवरा- बायकोचं नातं टिकून होतं. आता हा शब्द खूपच प्रचलित झाल्यामुळे ‘आम्ही वेगळे होतोय’ हे सांगताना जोडप्यांना अभिमान वाटतो. कुणालाही तडजोड करायची नाही. नवरा-बायकोचं नातं धोक्यात आलं की सगळीच नाती त्यामागून कोलमडून पडतात. तेच होऊ नये म्हणून भावनिक गुंतवणूक महत्त्वाची आहे. ती जर आधीच केली की मग उतारवयात काय करायचं असा प्रश्न सतावत नाही आणि एकमेकांचा सहवास नकोसाही वाटत नाही.’’
‘‘मी एक नट आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांमधून हे नाटक एन्जॉय करतोय. या दोन्ही भूमिका फार वेगळ्या आहेत. जेव्हा मी नट असतो तेव्हा मी दिग्दर्शक नसतो आणि जेव्हा मी दिग्दर्शक असतो तेव्हा मी नट नसतो. त्यामुळे या दोन्ही प्रक्रियांचा मी या नाटकामुळे मनापासून आनंद घेतो आहे. विक्रम काका माझे नाटकातले आदर्श आहेत. मी खूप लहानपणापासून त्यांना बघतो आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादानेच पुन्हा या नाटकाला सुरुवात करतोय.’’ एक नट म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना मंगेश कदम म्हणतात.
जून-जुल हा नवीन नाटके आणण्याचा काळ नसतानाही हे नाटक आणणे म्हणजे रिस्क वाटत नाही का या प्रश्नावर मंगेश कदम म्हणतात, ‘‘मी या सगळ्याचा फार विचार करत नाही. नाटकाची संहिता, नाटकातले कलाकार यांच्यावर विश्वास असला की असे प्रश्न पडत नाहीत. नाटकाला आजही भरघोस प्रतिसाद मिळतोय. अर्थात यात नाटकाची प्रसिद्धी करणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचाही तितकाच सहभाग आहे.’’
हे नाटक प्रत्येक घराघरातलं वाटण्यासाठी अभिनयासोबत नेपथ्य, वेशभूषा, संगीत, प्रकाशयोजना यांचाही तितकाच सहभाग आहे. रंगभूषाकार विक्रम गायकवाड म्हणतात, ‘‘नाटकातलं पात्र हे रंगभूषेपेक्षा कलाकाराच्या मनात उतरलं की जास्त खरं वाटतं. लीनाला मी सांगितलं की लीना, आपण साठी ओलांडलेली आहेस असं मनातून समज आणि अभिनय कर. मग सहज ते पात्र वठवू शकशील. त्यासाठी केस पांढरे करण्याची किंवा आणखी वेगळं काही करण्याची गरज नाही. ते वय सहज चेहऱ्यावर येईल.’’
‘‘या एका सांगण्यावरून मला माझी भूमिका करणं आणखीन सोपं गेलं,’’ असं लीना आपल्या भूमिकेबद्दल सांगतात.
एकूणच हे नाटक बघताना ‘के दिल अभी भरा नहीं’ ही उक्ती सार्थ वाटायला लागते. माणसाच्या धकाधकीच्या जीवनात त्याच्या हपापलेल्या हृदयावर फुंकर घालणारं माणसाचं नातं हेच संपूर्ण जगात शाश्वत आहे, तेच टिकवणं महत्त्वाचं आहे.
यहीं कहोगे तुम सदा
के दिल अभी नहीं भरा
जो ख़त्म हो किसी जगह,
ऐसा सिलसिला नही
असा नाटय़ानुभव देणाऱ्या या नाटकाला शुभेच्छा!
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य : लोकसत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu