डहाणूकर कॉलेजमध्ये वाजली ‘फोटोकॉपी’ची ‘पिपाणी’

कॉलेज लाईफ म्हणजे तरुणाईने फुललेला मळा… प्रेम, दोस्ती आणि खूप काही अनुभवण्याची संधी कॉलेजमध्येच मिळते. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा कॉलेजची सफर घडवून आणण्यासाठी आगामी ‘फोटोकॉपी’ हा सिनेमा सज्ज झाला आहे. सोशल साईटवर या चित्रपटाचा पोस्टर लॉंच झाला असून, या सिनेमातील गाण्याची ‘पिपाणी’ देखील कॉलेज कट्ट्यावर आता जोरात वाजताना दिसून येतेय. विले पार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात नुकतेच या चित्रपटातील ‘पिपाणी’ या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले. या सिनेमाच्या कलाकारांसोबत डहाणूकरच्या विद्यार्थ्यांनी ‘पिपाणी’ गाण्याचा मनसोक्त आनंद लुटला. पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस या फ्रेश जोडीला सादर करणारा हा सिनेमा युथसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे. 

धम्माल मस्ती आणि प्रत्येकाला ठेका धरण्यास भाग पाडणारे हे गाणे फोटोकॉपी चे दिग्दर्शक विजय मौर्य आणि ए व्ही प्रफुलचंद्र यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला म्युजिक देण्याचे,काम देखील ए व्ही प्रफुलचंद्र यांनी केले आहे. तसेच तरुणांईना आपल्या गाण्यांच्या ठेकात थिरकवणारी वैशाली सामंतने या गाण्याला स्वरसाज चढवला असून, प्रवीण कुंवरने देखील तिला चांगली साथ दिली आहे. रोमँटिक कॉमेडी बाज असलेल्या या सिनेमाचे ‘पिपाणी’ हे गाणे देखील त्याच धाटणीचे असल्यामुळे, कॉलेज तरुणांचे भरपूर मनोरंजन करणारे ठरत आहे.
व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या सिनेमात जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. पर्ण आणि चेतन या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu