चुपके चुपके © मुकुंद कुलकर्णी

धर्मेंद्र , शर्मिला दोघांचाही  ८ डिसेंबर हा वाढदिवस !   धर्मेंद्र आणि शर्मिला यांच्यात एक गोष्ट कॉमन होती , दोघेही फिजिकली एकदम फिट , नेहमीच ! धर्मेंद्र हा त्या काळातील खऱ्या अर्थाने तगडा ही मॅन आणि शर्मिला प्यारीसी गुडिया ! थुलथुलीत जाड हिरॉइन्सना जेव्हा सुगीचे दिवस होते तेव्हा ही सडपातळ गोड मुलगी खूप छान दिसायची . तिचा पहिलाच चित्रपट कश्मीरकी कली यामध्ये ती खुपच लोभसवाणी दिसली आहे अभिजात सौंदर्याचा नमुना ! शम्मी कपूर बरोबर तिची पडद्यावरची केमिस्ट्री आकर्षक होती . इव्हिनिंग इन पॅरिस मध्ये तिला स्विम सूट मध्ये दाखवली आहे पण ती आजिबात खटकली नाही बिभत्स तर अजिबात वाटली नाही . नंतर काकेबरोबर पण हिने काही सुंदर चित्रपट दिले .

हिच गोष्ट धर्मेंद्रची चिकण्या चोपड्या हिरोंच्या जमान्यात हा देखणा बॉडी बिल्डर लोकांना आवडून गेला . आपल्या अभिनयाच्या मर्यादा ओळखून होते दोघेही . प्रेक्षकांना त्यांनी कधीही निराश केलं नाही . दोघेही ऐंशी च्या अल्याड पल्याड आहेत पण आजही तेवढेच फिट आहेत , असेच राहू देत !

अनुपमा , देवर , सत्यकाम , चुपके चुपके असे सुंदर चित्रपट दिले आहेत या जोडीने . दोघांच्या बाबतीत एक गोष्ट दुर्लक्षित राहिली ती म्हणजे दोघांनाही विनोदाची उत्तम जाण होती . चुपके चुपके दोघांच्या सहज सुंदर अभिनयाने नक्कीच भावतो . आमच्या पिढीला आनंद देणाऱ्या जोडीतील ही एक ठळक जोडी ! आणि या जोडीचा प्रसन्न , निखळ आनंद देणारा विनोदी चित्रपट चुपके चुपके !

खूप दिवसांनी काल ‘ चुपके चुपके ‘ सिनेमा पाहिला . बॉलिवूडची निखळ कॉमेडी . हिंदीत कॉमेडी तशी उपेक्षितच . खरं तर धर्मेंद्र हा रांगडा माणूस आहे पण त्याला कॉमेडीची उत्तम जाण आहे . बिग बी बद्दल काय बोलायचं कुठलाही रोल हा त्याचाच असतो . जया भादूरी बद्दलही असंच म्हणता येईल . हे दोघेही खऱ्या अर्थाने व्हर्सटाईल आहेत . ओमप्रकाश हा मला नेहमीच अंडररेटेड अभिनेता वाटतो दिलेला रोल चोखपणे कसा पेश करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे ओमप्रकाश . या सगळ्या मांदियाळीत शर्मिला खपून गेली आहे खटकली नाही . तिच्या नेहमीच्या स्टाईलने ओठांचा लाडिक चंबू करत तिने हा ही रोल निभावला आहे , पण ठीक आहे चलता है ! सभ्य आणि सुसंस्कृत विनोद नेहमीच आनंद देऊन जातो . कुठेही द्वयर्थी संवाद नाहीत विनोदामध्ये अश्लीलता आजिबात येऊ दिली नाहीये . सभ्य , सुसंस्कृत , सुशिक्षित उच्चभ्रू आणि पापभिरू मध्यमवर्गीय समाजाचे सुरेख चित्रण आहे या चित्रपटात . मूळ कल्पना परकीय आहे काय याचा शोध घ्यायला हवा . आपल्याकडेही उच्च दर्जाचा विनोद आहेच , त्याबद्दल काहीही संदेह नाही . पण हा चित्रपट पाहताना का माहित नाही , पण पी जी वोडहाऊस आठवत होता . उच्चभ्रू अमीर उमराव त्यांची खानदानी जीवनशैली , बटलर , मेड सर्व्हंट्स , त्यातील पात्रांचा सुसंस्कृत वावर उच्च दर्जाचा निखळ विनोद सगळंच आनंददायी होतं . अतिशय शुद्ध हिंदी बोलणारा बॉटनीचा प्राध्यापक धर्मेंद्रने मस्त उभा केला आहे .

इंग्लीश लिटरेचरच्या प्राध्यापकावर आवडत्या विद्यार्थिनीला बॉटनी शिकवायची वेळ येते की ज्याला बॉटनीचा ओ की ठो माहिती नाही . प्रियेला इंप्रेस करत असता तो आधीच विवाहित असून फ्लर्टिंग करतोय या गैरसमजातून चिडलेली त्याची लाडकी विद्यार्थिनी . अमिताभ आणि जया या रोलमध्ये परफेक्ट फिट झाले आहेत . ओमप्रकाशचा स्मार्ट पितृतुल्य जिजाजी केवळ अविस्मरणीय . त्याच्यावर कुरघोडी करण्यासाठी केलेली निरुपद्रवी नाटकं , त्यातून निर्माण होणारे पेचप्रसंग थोड्याशा फार्सिकल अंगाने सुरेख रंगवले आहेत . एकंदरीतच समजुतीचे घोटाळे मजा आणतात . असरानी , डेव्हिड या दिग्गज कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे . सचिनदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता , किशोर , मुकेश , रफी या दिग्गजांनी पेश केलेली चार सुरेल गीतं आहेत . शेवटी चहाच्या पेल्यात शांत होणारं हे वादळ , ही सुखांतिका प्रेक्षणीय आहे . आखिर हृषीदा है भाई !

धरमजी , शर्मिला जी हॅप्पी बर्थडे !!

 © मुकुंद कुलकर्णी
पूर्वप्रसिद्धी – www.thinkmarathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu