‘कॉमन मॅन’ चे जनक,सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण
आर. के. लक्ष्मण ©मुकुंद कुलकर्णी”
“I am very happy with my politicians . They did not take care of the country , but they took care of my job . “
‘ कॉमन मॅन ‘ चे जनक , सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा २४ ऑक्टोबर हा जन्मदिवस . २४ ऑक्टोबर २०२० पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले. दि.२४ ऑक्टोबर १९२१ रोजी म्हैसूर येथे रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांचा जन्म अय्यर कुटुंबात झाला . सुप्रसिद्ध लेखक आर.के.नारायण यांचे ते लहान बंधु . आठ भावंडातले ते सर्वात लहान .
चित्रकलेची आवड लक्ष्मण उपजतच घेऊन आले . लहानपणापासून त्यांना चित्रं काढायचा छंद होता . द स्ट्रँड,पंच,बायस्टँडर , वाईल्ड वर्ल्ड अशा मासिकांमधील रेखाटने , व्यंगचित्रे पहाण्यात लक्ष्मण गुंगुन जात . लिहायला वाचायला शिकण्याआधीच लक्ष्मण चित्रकला शिकले . स्वतःच्या कल्पनाशक्तीने ते उत्तम चित्रे काढत . घराच्या भिंती ,फरशा,दरवाजे यावर ते चित्रं काढत . सहज रेघोट्या ओढत ते शाळेतील शिक्षकांची रेखाचित्रे काढत . शाळेतील शिक्षकांनी , त्यांनी काढलेल्या पिंपळपानाच्या चित्राच्या केलेल्या कौतुकामुळे आपल्यात दडलेल्या कलाकाराचा त्यांना साक्षात्कार झाला . स्वतःला ते उदयोन्मुख कलाकाराच्या रुपात पाहू लागले . प्रख्यात ब्रिटिश कार्टूनिस्ट सर डेव्हिड लो यांच्या शैलीचा त्यांच्यावर पगडा होता . लहानपणी बराचकाळ चित्रांखालील त्यांची सही ते low ऐवजी cow अशी वाचायचे ! द हिंदू मध्ये लो यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत . लहानपणीच्या आपल्या चित्रांबद्दल लक्ष्मण ‘ The Tunnel Of Time ‘ या आपल्या आत्मचरित्रात लिहितात , ” I drew objects that caught my eye outside the window of my room – the dry twigs , leaves and lizard- like creatures crawling about , the servant chopping fire wood and of course and number of crows in various postures on the rooftops of the buildings opposite . ”
कावळा हा लक्ष्मण यांचा आवडता पक्षी होता . त्यांच्या दृष्टीने तो ‘ Uncommon bird ‘ होता . लक्ष्मण यांच्या पत्नी कमला म्हणतात , ” He likes crows for their colour and also because the bird is very intelligent . He loves crows more than me .”
शाळकरी मुलांच्या ‘ रफ अँड टफ अँड जॉली ‘ या क्रिकेट टीमचे लक्ष्मण कॅप्टन होते .
‘Dodu the money maker’ आणि ‘ The regal cricket club ‘ या आर.के.नारायण यांच्या गाजलेल्या कथा लक्ष्मण यांच्या शालेय जीवनातील माकडचेष्टांवर आधारित आहेत . संथ चाललेल्या त्यांच्या बालवयातील आयुष्याला धक्का देणारी घटना म्हणजे , अर्धांगवायूच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे झालेले दुःखद निधन .हा धक्का पचवायला मोठे भाऊ समर्थ असल्यामुळे त्यांचे शालेय जीवन सुरळीत सुरू राहिले .
शालेय शिक्षण संपल्यावर आपल्या अत्यंत आवडत्या ड्रॉइंग आणि पेंटिंग या विषयात करियर करण्याच्या उद्देशाने लक्ष्मण यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेत आपला प्रवेश अर्ज दाखल केला . पण जे जे स्कूलच्या डीन नी त्यांच्या प्रवेश अर्जाच्या उत्तरादाखल त्यांना कळवले , ” या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक त्या गुणवत्तेचा अभाव असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात येत आहे . ” हे म्हणजे , आईनस्टाईनच्या प्रगती पुस्तकावर शिक्षकांनी मंदबुद्धी असा शेरा मारला होता तसेच झाले ! शेवटी म्हैसूर विद्यापीठातून लक्ष्मण यांनी बीए ची पदवी प्राप्त केली . हे चालू असताना व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रात त्यांची ‘ फ्री लान्सर’ कारकीर्द सुरू होती .
सुरूवातीच्या काळात स्वराज्य , ब्लिझ या मासिकांसाठी त्यांनी काम करण्यास सुरूवात केली . मोठे बंधू नारायण यांच्या द हिंदू मध्ये छापून येणाऱ्या कथांना त्यांची चित्रे प्रसिद्ध होऊ लागली . त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रांमधून त्यांची राजकीय व्यंगचित्रे प्रसिद्ध होऊ लागली .
लक्ष्मण यांची पहिली पूर्णवेळ नोकरी ‘ द फ्री प्रेस जर्नल ‘ मुंबई येथे सुरू झाली . येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी व्यंगचित्रकार होते . इ.स.१९५१ मध्ये त्यांनी ‘ द टाईम्स अॉफ इंडिया ‘ जॉईन केले आणि तिथून सुरु झाली त्यांची पन्नासहून जास्त वर्षांची देदिप्यमान कारकीर्द . ‘ कॉमन मॅन ‘ जन्माला आला . ‘ यू सेड इट् ‘ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय रोजचे व्यंगचित्राचे सदर सुरू झाले आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला . एशियन पेंटच्या जाहिरातीतील ‘ गट्टू ‘ ही त्यांचीच कल्पना . ‘ द हॉटेल रिव्हिएरा ‘ सारख्या काही कादंबऱ्याही लक्ष्मण यांनी लिहिल्या . मिस्टर अँड मिसेस 55 अशा काही हिंदी चित्रपटातूनही त्यांची कार्टून्स झळकली . मोठे बंधू आर.के. नारायण यांच्या ‘ मालगुडी डेज ‘ या सर्वकालीन ‘ क्लासिक ‘ कलाकृतीला लक्ष्मण यांच्या तितक्याच ‘ क्लासिक’ रेखाचित्रांनी शोभा आणली . याच नावाची टीव्ही सिरियल तसेच ‘ वागळेकी दुनिया ‘ अशा टिव्ही सिरियल्समधे त्यांची कार्टून्स , स्केचेस झळकली . डेव्हिड लो , टी.एस्.इलियट , बर्ट्रांड रसेल , जे.बी.प्रिस्ली , ग्रॅम ग्रीन इत्यादींची त्यांनी काढलेली कॅरिकेचर्स प्रसिद्ध आहेत .
लक्ष्मण यांचा कॉमन मॅन प्रचंड लोकप्रिय झाला . त्याच्या जन्माविषयी लक्ष्मण म्हणतात ,
” I never found the common man , he found me . I was looking in the crowed and he came and stood in front of me . ” लक्ष्मण यांचा कॉमन मॅन व्यंगचित्रातून कधीही बोलला नाही , त्यावर ते म्हणतात , ” The power is in keeping ones mouth shut , not in blah – blahing . ”
पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल लक्ष्मण यांना सॉफ्ट कॉर्नर होता . याचा अर्थ ते काँग्रेसच्या बाजूचे होते असा नाही . उलटपक्षी आपल्या व्यंगचित्रातून त्यांनी पंडित नेहरू आणि काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर घणाघाती टीका केली . व्यंगचित्रं काढताना आणि राजकीय टिप्पणी करताना ते पूर्णपणे न्यूट्रल , निःपक्षपाती असत . नेहरूंविषयी ते म्हणतात , ” He was the best ….. gentle , cultured and caring . He called me for 10 minutes , but our meeting went on for an hour . ”
Name one good politician या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं ” Manmohan Singh . ”
‘ Timeless Laxman ‘ या पुस्तक प्रकाशन समारंभात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ,
” R. K. Laxman’s cartoons don’t hurt people , but have a healing power . ”
इतर अनेक पारितोषिकांबरोबर भारत सरकारने त्यांना इ.स.१९७३ साली ‘ पद्मभूषण ‘ आणि इ.स.२००५ साली
‘ पद्मविभूषण ‘ ने गौरवले . इ.स.१९८४ साली त्यांना ‘ रेमन मॅगसेसे ‘ पुरस्कार प्राप्त झाला होता .
दि.२६ जानेवारी २०१५ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले .
आजूबाजूला , जगभरात घडणाऱ्या घटनांचे अचूक टिपण , उत्तम निरिक्षण , कुशाग्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर त्यांनी काढलेली व्यंगचित्रे कायमच लक्षात राहतात . चौकड्याचा कोट , धोतर , टोपी , छत्री अशा साध्या वेशातला त्यांचा ‘ कॉमन मॅन ‘ अजरामर झाला आहे . लक्ष्मण यांनी एकाहून एक सरस अशी असंख्य व्यंगचित्रे काढली पण , या माध्यमातून त्यांनी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत . इतका दीर्घकाळ व्यंगचित्रे काढणारे लक्ष्मण हे बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावेत . जवाहरलाल नेहरू , महात्मा गांधींपासून अटलबिहारी बाजपेयी , लालकृष्ण अडवाणी , सोनिया गांधींपर्यंत राजकीय नेत्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी रेखाटल्या आहेत . सशक्त रेषांमधून या नेत्यांची व्यक्ती वैशिष्ट्ये स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती . लक्ष्मण यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय व्यंगचित्रे बहारदार असत . जगभरातील सर्व प्रसिद्ध राजकीय नेत्यांची बोलकी व्यंगचित्रे ते काढत असत . लक्ष्मण यांनी आपल्या व्यंगचित्रातून खिल्ली उडवली नाही असा राजकारणी विरळा ! भारतीय राजकारणातील गमतीजमती ह्या नेहमीच त्यांच्या पहिल्या पानावरील व्यंगचित्रातून व्यक्त होत असत . इतक्या तल्लखपणे सामाजिक आणि राजकीय जीवनातील विसंगती शोधून काढणारे फारच थोडे व्यंगचित्रकार आहेत .
अशा ह्या जगप्रसिद्ध , सुसंस्कृत व्यंगचित्रकारास आदरपूर्वक अभिवादन !
मुकुंद कुलकर्णी©
pc:google
Also published at our group website www.thinkmarathi.com