इरफान खान- …..जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये

बॉलिवूडमधल्या कुठच्याही खानाच्या तसा मी प्रेमात नाही. तसा कुणाला विरोधही नाही पण कुठच्या खानाचा एखादा चित्रपट बघायचा राहून गेला तर रुखरुख वाटत नाही. या सर्व खान मंडळीत त्या मानाने नव्यानेच जे नाव झळकायला लागले होते ते म्हणजे इरफान खानचे. या कलाकाराने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकले आणि पुढे पुढे तर त्याचे प्रत्येक काम बघणे कर्तव्य होऊन बसले. लॉकडाऊन असूनही याचा अंग्रेजी मिडीयम तुफान चालला कारण इरफान खानचे काम बघायला लोकं जमले तर थिएटर, जमले तर टीव्ही नाहीतर डिजिटल प्लॅटफॉर्म कशाचाही सहारा घ्यायला लागले. पडद्यावरचा इरफान खान कधी अभिनय करताना दिसलाच नाही इतके ते त्याचे सहज वावरणे असायचे. किंबहुना हेच इरफानने बाकीच्या खान मंडळींपेक्षा वेगळेपण होते. ना त्याला कधी सिक्स पॅक्स लागले, ना कधी सुंदर सुंदर हिरोईन्स लागल्या. याचे मुख्य कारण म्हणजे इरफानने पडद्यावर ज्या भूमिका साकारल्या त्यात तो तुमच्या आमच्यात वावरणारा जमिनीवरचा माणूस असायचा आणि सामान्य माणसाला फँटसीत जगणे परवडत नाही.

ऐशीच्या दशकात अमिताभसारखा मात्तब्बर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाही आपल्या सहजसुंदर आणि कॉमन मॅनच्या इमेजने अमोल पालेकरने अमिताभला यशस्वी टक्कर देत आपले स्थान राखले, आपला प्रेक्षकवर्ग तयार केला होता. इरफानने नेमके हेच केले आणि नुसत्या नावानेच शंभर कोटीच्या गल्ल्याची बोली लावणाऱ्या बाकीच्या खान, कपूर मंडळीत आपले स्थान निर्माण केले. नुसते निर्माणच केले नाही तर ते अढळ बनवून टाकले. आजकाल पडद्यावर कवायती बघायला मिळतात पण कॅमेऱ्यासमोर नुसत्या मुद्राअभिनयाने खूप काही करता येते हे इरफानने पडद्यावरच्या आपल्या प्रत्येक फ्रेममध्ये दाखवून दिले. ना त्याला भारतीय चित्रपटसृष्टीने प्रमाणित केलेली हिरोची शरीरयष्टी होती ना बुलंद आवाज होता पण हे नसणेच त्याची बलस्थाने बनत गेली.

इरफानची कारकीर्द बघता अगदी मीरा नायरच्या सलाम बॉम्बेतील छोट्या भूमिकेपासून ते अंग्रेजी मिडीयम पर्यंत त्याला ज्या विविध भूमिका करायला मिळाल्या त्या बघितल्या कि कुणाही कलाकाराला त्याचा हेवा वाटेल. सलाम बॉम्बेतील लक्षवेधी भूमिकेनानंतरही तो बॉलिवूडमध्ये चाचपडतच होता. बॉलिवूडचेहि काही अजब चमत्कार असतात. जसं क्रिकेटमध्ये सुमार खेळाडूही आपल्या नशिबाने काही काळ आपले संघात स्थान टिकवून असतो आणि तो बाहेर गेल्यावर आपल्याला “याला इतका वेळ आपण कसा ठेवला” हा साक्षात्कार होतो तसेच बॉलिवूडमध्ये तद्दन सुमार कलाकारही सिल्व्हर ज्युबिली स्टार बनू शकतो. पण ज्यात खरेखुरे गुण आहेत असे क्रिकेटमधले असोत वा बॉलिवूडमधले हिरे फारकाळ झाकोळलेले राहू शकत नाहीत. त्यांचे पैलू लकाकायलाच लागतात. इरफानने हासील मधील नकारात्मक भूमिकेसाठी फिल्मफेअर जिंकले आणि त्याची गाडी पुन्हा सुसाट धावू लागली. पानसिंग तोमर मधील डाकू ते धावपटू हा बदल ते अगदी अलीकडच्या पिकूतला गाडीवाला ते अंग्रेजी मिडीयम मधला जिद्दी बाप हे सर्व पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे चित्रपट बनले. मला वाटते त्याच्या भूमिकेतील (काही अपवाद वगळता) सकारात्मकता या यशामागे मुख्य कारण आहे.
इरफान खान ज्या सहजतेने पडद्यावर वावरला त्या सहजतेने तो हॉलीवूडलाहि पोहोचला. वास्तविक हॉलिवुडला पोहोचणे हा काही आपल्या कुठच्या कलाकारासाठी पसंतीचा शिक्का असायची गरज नाही पण हॉलीवूडमुळे तुमचे नाव जगभर होते हे नाकारण्यासारखे नाही. किंबहुना याच कारणाने एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटात भूमिका मिळाली कि आपल्याकडच्या नावाजलेले कलाकारहि हात गगनाला पोहोचल्यासारखे त्या भूमिकेबद्दल बोलत असतात तिथे इरफान खान हॉलीवूडमध्येही सहज वावरून आला. स्लमडॉग, लाईफ ऑफ पाय, ज्युरासिक वर्ल्ड सारख्या चित्रपटात नामांकित चित्रसंस्थांकडून तो झळकला.

आज इरफान गेल्यावर त्याचे काही जुने व्हिडीओ बघत होतो. २०१८ ला लंडनला उपचार घेताना त्याने म्हटले आहे कि मी इथे ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्या गॅलरीतून मला लॉर्ड्स दिसत आहे, विवियन रिचर्ड्सचे हसणारे पोस्टर दिसत आहे . मला माहित आहे कि मी अनेक स्वप्ने घेऊन एका फास्ट ट्रेनमध्ये असताना मागून टीसी येऊन सांगत आहे कि तुमचा स्टॉप आला आहे. आयुष्यभर सकारात्मक असणाऱ्या इरफानच्या या संदेशातून पहिल्यांदाच त्याच्या दु:खाची किनार दिसत होती. याच संदेशात तो म्हणतो कि माझ्या असंख्य चाहत्यांकडून आलेल्या शुभेच्छा मला एक नवीन ऊर्जा देत आहेत. या वर्णनावरून असे दिसते कि इरफान लंडनच्या सेंट जॉन्स वूड ट्यूब स्टेशनबाहेरच्या वेलिंग्टन रोड वरच्या वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये असावा कारण तिथून लॉर्ड्स हाकेच्या अंतरावर आहे. आता वाटते कि २०१८ च्या लॉर्ड्स कसोटीच्या वेळी सलग चार दिवस मी या वेलिंग्टन हॉस्पिटलसमोरून सामन्याला जात होतो. तिथे आत इरफान आहे हे कळल्यावर कदाचित त्याला भेटायचा प्रयत्नही केला असता. कमीतकमी रोज मान वर करून गॅलरीकडे तर नक्कीच बघितले असते. सामन्याचा पहिला दिवस वाहून गेल्यावर भारताची फास्ट ट्रेन थांबवायला अँडरसन आणि ब्रॉड हे दोन टीसी आले होते हे बघूनच इरफानला हे सुचले नसेल ना?

अंग्रेजी मिडीयम बघताना इरफान पुन्हा परतला असे वाटत असतानाच आज हि बातमी येऊन धडकली. जेव्हा किशोरकुमार, रफी हे वयाची साठी गाठायच्या आतच गेले तेव्हा जसे वाटले तसेच आज वाटत आहे पण “बाबू मोशाय….जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये” या त्रिवार सत्याने जसं आजही रेडिओ, लाईव्ह शो किंवा रिऍलिटी शोज हे रफी किशोरच्या गाण्यांनी व्यापून असतात तसेच इरफान त्याच्या भूमिकेतून अजरामर झाला आहे. जसं तो स्वतः:च त्याच्या भूमिकांबद्दल बोलतो तसं इरफान पडद्यावर बघताना आम्ही हसू, हसता हसता आमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होतील पण पुन्हा आम्ही हसू …फार लवकर गेलास रे….

-निमिष वा. पाटगांवकर
pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu