कट्यार काळजात घुसली – थेट काळजाला भिडणारी कट्यार ….
दिग्दर्शनाला प्रारंभ करताना नाटक ते सिनेमा हे माध्यमांतर करत कट्यार काळजात घुसली या सिनेमातून सुबोध भावेनी रसिकांना एक अप्रतिम कलाकृती भेट दिली आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुमधुर संगीताने सजलेल्या आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने इतिहास घडवला. याच नाटकाच सिनेमात रुपांतर करताना नाटकातील घेई छंद , तेजोमय लोहगोल , लागी कलेजवा अशी अजरामर श्रवणीय नाट्यगीते घेताना नवीन अप्रतिम गाणीही बेमालूम यात बसवली आहेत. म्हणूनच हि कट्यार थेट काळजाला भिडते आहे. या सिनेमाच्या केंद्रस्थानी संगीत आहे . २ घराण्यामाधला , २ गायकांमाधला सशक्त संघर्ष दाखवत संगीताची मेजवानीच रसिकांना दिली आहे .
विश्रामपूर च्या राजांच्या दरबारी पंडित भानुशंकर शास्त्री हे राजगायक असतात. त्यांच्या संगीताप्रमाणे त्यांचा स्वभावही ही मृदू असतो. त्यांची खांसाहेबांशी मिरजेत भेट होते आणि मैत्रीही होते , ते त्यांना विश्रामपूरला येण्यास सांगतात. पंडितजींना विश्रामपूर मध्ये कोणी आव्हान देणारे नसते पण खांसाहेब विश्रामपूरला आल्यावर पंडितजींना दसऱ्याच्या संगीत स्पर्धेत आव्हान देतात. सतत १३ वर्षे खांसाहेब हरतात . इर्षा , द्वेष , असूया या मैत्रीची जागा घेतात . पंडितजींपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिध्द करण्याचा खाँसाहेबांचा ध्यास असतो . खरं तर दोघेही सर्वोत्तम दर्जाचे कलाकार, पण पंडितजींचा स्वभाव त्यांच्या गायकीसारखाच मृदू त्यांचं गायन ऐकून लोक भान हरपतात आणि टाळ्या वाजवायलाही विसरतात. खाँसाहेब आणि त्यांची गायकी पंडितजींपेक्षा अगदी उलट प्रकृतीची खाँसाहेबांची गायकी आक्रमक आणि हरकतींनी भारलेली ही गायकी रसिकांना डोलायला लावते. पण राजा जसे म्हणतात , काही कलाकारांना दाद हि टाळ्यांनी दिली जाते तर काहींना डोळ्यांनी. त्यासाठी पंडितजिंसारखी साधना लागते. आणि विजेते पंडितजी होतात. १३ वर्षे पंडितजिंबरोबर हरल्यावर १४व्या वर्षी सच्च्या कलाकाराची कदर न करता स्वत:च्या घराण्याचा अभिमान बाळगणारे खाँसाहेब जिंकूनही हरतात, त्याची ही गोष्ट… अनेक वळणंवळणं घेत, माणसांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू दाखवत हा सगळा पट मांडलेला आहे. यात शिष्याची व्यथा आहे, खर्या साधकाची त्यागवृत्ती आहे, द्वेषाचं राजकारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वरांचा उत्सव आहे, मन दीपवून टाकणारी, तल्लीन करायला लावणारी सुरांची मैफल आहे, संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे. पण जुन्या गाण्यांना परत संगीतबद्ध करताना शंकर , एहसान , लॉय यांनी जुन्या पदांना अजिबात धक्का लावला नाहीये.
अभिनयात पदार्पण करताना शंकर महादेवन हे पंडितजींच्या भूमिकेत छान दिसत आहेत त्यांनी अभिनय हि खूप छान केला आहे , सचिनजींचा अभिनय, त्यांची उर्दू संवाद शैली कान , डोळे दिपवून टाकते. सुबोध भावे , अमृता खानविलकर , मृण्मयी देशपांडे यांचे अभिनय उत्तम झाले आहेत.
हा चित्रपट म्हणजे खरच एक संगीतमय मेजवानीच आहे.

