नाटक रिव्ह्यू -दोन स्पेशल

अथर्व थिएटर आणि मिश्री थिएटर निर्मित आणि क्षितीज पटवर्धन लिखीत-दिग्दर्शित, ‘दोन स्पेशल’ हे नाटक मागच्या वर्षी २०१५ मध्ये रंगभूमीवर आले. ह. मो. मराठे यांच्या कथेवर जरी हे नाटक आधारित असले, तरीही पूर्णपणे नवी संहिता वाटावी, अशा पध्दतीने हे नाटक आपल्यासमोर येते.पत्रकारिता करताना दोन पत्रकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण पुढे परिस्थितीमुळे त्यांची ताटातूट होते. साधारणपणे १० वर्षांनी त्यांची पुन्हा भेट होते पण त्यावेळी त्यांचे लग्न दुसऱ्या कुणाशीतरी झालेले असते. ज्या वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये त्यांची कहाणी १० वर्षांपूर्वी सुरु झालेली असते तिथेच ते दोघे एकमेकांना भेटतात. पण आता भेटण्याचे कारण , परिस्तिथी बदललेली असते. त्याच्या उलगडणाऱ्या भूतकाळाचा इमोशनल प्रवासावर प्रेक्षकांना या नाटकात पाहायला मिळेल.
पहिल्या अंकात १९८९ सालाची पत्रकारिता आणि पत्रकारांची त्यावेळची दुनिया , त्यावेळचे वातावरण हे दाखवले आहे पण दुसऱ्या अंकात प्रेक्षक पूर्णपणे एका भावनिक सफरीवर जातात. दुसऱ्या अंकात अनेक ट्विस्ट येतात जे नाटकाबद्दलची उत्कंठा अधिक वाढवतात. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना आणि अनमोल भावे यांचे ध्वनी रेखाटन व संगीत यामुळे नाटक अधिकच खुलत जाते.
ह्या नाटकाचे कथानक जितेंद्र जोशी व गिरीजा ओक-गोडबोले यांच्यामध्येच घडत असल्यामुळे दोघांनाही मोठमोठे संवाद अनेकदा या नाटकात बोलायला लागले आहेत. पण या दोघांचा अभिनय इतका नैसर्गिक व पक्का आहे कि नाटकाचा हा नाट्यानुभव प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक ठरतो. या नाटकात आजपासून साधारण २५ वर्षांपूर्वीचा काळ दाखवला आहे. त्यामुळे त्यावेळची मानसिकता , भावविश्व हि सारी आजच्या फास्ट पिढीला समजणे कदाचित थोडे कठीण जाऊ शकते पण नाटकाची आवड असणाऱ्या प्रेक्षकाला हा नाट्यानुभव खरंच खूप रंजक वाटेल हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu