Gat Mat Marathi Movie Review

पार्टनर या चित्रपटात सलमान खानने साकारलेली लव्ह गुरुची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटातील लव्ह गुरू प्रमाणे एखादा तरी लव्ह गुरू प्रत्येक कॉलेज मध्ये असतो. तो गॅट मॅट जुळवायला मदत करत असतो. असेच गॅटमॅट जुळवून देणाऱ्या काही मित्रांची गोष्ट म्हणजे गॅटमॅट चित्रपट.
रंग्या (अक्षय टंकसाळे) बगळ्या (निखिल वैरागर) एका छोट्या गावातून शिक्षणासाठी शहरात येतात. शहरातील मुलांचे राहणीमान, त्यांच्याकडे असणारा पैसा पाहून आपल्याकडे देखील खूप पैसे असावेत असे त्यांना वाटू लागते या शहरी वातावरणाकडे ते आकर्षिले जातात. त्यातच त्यांची मैत्री रवी (प्रमोद पुजारी) आणि किरण (शेखर बेटकर ) यांच्यासोबत होते. हे चोघे आणि त्यांची मैत्रीण इशा (पूर्णिमा डे) मिळून पैसा कमवण्यासाठी एक शक्कल लढवतात. कॉलेज मधील मुलांचे लव्ह गुरू बनण्याचे ते ठरवतात आणि त्यातून चांगला पैसा देखील कमवतात. कॉलेज मध्ये त्यांनी प्रेमप्रकरणे जुळून द्यायला सुरुवात केली आहे हि गोष्ट त्यांचे प्रिंसिपल (उदय टिकेकर) यांना कळते. पण रंग्या आणि त्यांची मुलगी काव्या (रसिका सुनील) यांचे प्रेमप्रकरण असल्याने ही मुले वाईट नाहीत असे ती वडिलांना पटवून देते. आपली ही गोष्ट पुन्हा प्रिन्सिपलच्या लक्षात येऊ नये यासाठी ते कॉलेज मधील आपला व्यवसाय गुंडाळतात आणि ऑफिस घेऊन गॅटमॅट नावाची एक वेबसाईट काढतात आणि लोकांना जोडीदार मिळवून देतात. पण याच त्यांच्या कामामुळे ते एका संकटात सापडतात. त्या संकटातून ते बाहेर पडतात का, त्यांचे पुढे काय होते या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

गॅटमॅट या चित्रपटाची सुरुवात पोलीस स्टेशनपासून होते. त्यामुळे ही मुले कोणत्यातरी प्रकरणात अडकली आहेत याचा आपला अंदाज येतो. यांनी काय केले आहे याची उत्सुकता देखील निर्माण होते. पण चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यावर आपली चांगलीच निराशा होते. या मुलांचे कॉलेज विश्व, त्यांच्यातील नातेसंबंध चांगल्याप्रकारे मांडले आहेत. अतुल तोडणकर यांची मुले वर्गात टर उडवतात तो प्रसंग, गॅटमॅटच्या ऑफिस मध्ये जोडीदार शोधायला आल्यानंतर आपल्या पत्नीचीच तिथे भेट होणे हे प्रसंग चांगले जमून आले आहेत. पण तराही हा चित्रपट मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरतो. तसेच चित्रपटात उगाचच अश्लील संवादाचा खूप जास्त प्रमाणात वापर करण्यात आला आहे. अक्षय, रसिका, निखिल, पूर्णिमा यांनी कामे चांगली केली आहेत. पण कथेत दमच नसल्याने हा चित्रपट रसिकांसोबत गॅटमॅट करण्यात अपयशी ठरतो.

-प्राजक्ता चिटणीस
– लोकमत 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu