प्रेमात पाडणारा ‘इशारा’ – मराठीतल्या पहिल्या सिंगल सॉंगचे परदेशात चित्रीकरण
मराठी सिनेसृष्टीत होणारे असंख्य बदल आपण पाहत आहोत. असाच एक नवीन बदल आपलयाला एका मराठी सिंगल सॉंगमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलिवुडमध्ये आपल्याला अनेक सिंगल सॉंग पाहायला मिळाले आहेत. या सिंगल सॉंगची क्रेझ आजच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ही क्रेझ लक्षात घेता निखिल रानडे हा गायक रोमॅंटिक सिंगल सॉंग प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या निखिल रानडे यांनी ‘यार’ तसेच सावनी रवींद्र यांच्या ‘झोका तुझा’ या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. पार्श्वगायनाचा छंद जोपासणाऱ्या निखिल यांचा ‘इशारा तुझा’ हा मराठी म्युझिक सिंगल प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘इशारा तुझा’ या सिंगल सॉंगची खासियत म्हणजे हा संपूर्ण अल्बम लंडन येथे चित्रित करण्यात आला आहे. परदेशात चित्रित करण्यात आलेला हा पहिलाच मराठी म्युझिक सिंगल आहे. या सिंगल सॉंगमध्ये आपल्याला निखिल रानडे आणि प्रियांका ठाकरे- पाटील असे नवीन चेहरे दिसणार आहेत. ऋषिकेश नेरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रश्मीम महागावकर यांनी संगीत दिले असून खुद्द निखिल रानडे यांनी गायलं आहे. राजीव रानडे यांनी आपल्या दिग्दर्शकीय नजरेतून हे गाणं साकारलं आहे. राजीव रानडे हे निखिल रानडे यांचे वडील बंधू असून या गाण्याची सिनेमॅटोग्राफी राजीव यांनी केली आहे. प्रेमात पडल्यानंतरच्या पहिल्या भावनेवर आधारित असलेल्या या सिंगल सॉंगमध्ये पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचा या जोडीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल रानडे या गाण्याविषयी खूप उत्सुक असून प्रेक्षक ‘यार’ इतकंच या गाण्यावरसुद्धा प्रेम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या निर्मितीसंस्थेअंतर्गत अजून काही चांगल्या कलाकृती सादर करण्याचा त्यांचा मानस असून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे हा मुख्य उद्देश निखिल रानडे यांचा आहे.