Naal Marathi Movie Review -खरोखरच प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडणारा चित्रपट

नाळ हा खरोखरच प्रेक्षकांशी नाळ जोडणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची सिनेमेटोग्राफी आणि यातीळ पात्रांचे अभिनय. सगळ्यांनी आपल्या भूमिका इतक्या उत्तम वठवल्या आहेत की त्या बघताना किंवा अगदी चित्रपटातले वेगवेगळे देखावे बघाताना थोडा काळ ही जागेवरून उठावे असे वाटत नाही.
हि कथा एका खूप लांबच्या खेड्यात शूट केली आहे. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हे खेडे खरंच खूप लांब आहे कारण इथे पोहोचायला ट्रेन , बस, होडी, बैलगाडी अशा चारही साधनांचा वापर करावा लागतो.



ही कथा एका छोट्या मुलाची आहे ज्याचे नाव चैतन्य. हा चैत्या खूप खट्याळ , मस्ती करणारा तरीही लोभस , गोंडस असा वाटतो. चैत्या (श्रीनिवास पोकळे) एका छोट्या गावात आई (देविका दफ्तरदार) वडील (नागराज मंजुळे) आणि आजी सोबत राहत असतो. तो आई, वडील, आजी यांचा प्रचंड लाडका असतो. त्याचे कुटुंब हेच त्याचे जग असते. गावातल्या मुलांसोबत मस्ती करणे, नदीत खेळणे ही त्याची आवडती कामे… एखाद्या लहान मुलाप्रमाणेच तो आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या आयुष्यात रममाण असतो. पण एक दिवस त्याच्या घरी त्याचा एक मामा (ओम भुतकर) येतो. या मामला त्याने कधीच पाहिलेले नसते. या मामाकडून त्याला कळते की, त्याचे आई वडील हे त्याचे खरे पालक नसून त्यांनी त्याला दत्तक घेतले आहे, हे कळल्यावर त्या चिमुकल्याच्या मनाची काय घालमेल होते हे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी खूप छान प्रकारे मांडले आहे.
नाळ या चित्रपटाचे लोकेशन आणि सिनेमॅटोग्राफी इतकी अप्रतिम आहे की हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यात खरी मजा आहे. सुरुवातीला चित्रपट थोडासा संथ वाटत असला तरी नंतर चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी अतिशय सहजपणे अभिनय केला आहे. श्रीनिवास, देविका, नागराज या सगळयांनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत. श्रीनिवासच्या चेहऱ्यावरील निरागस भाव तर प्रेक्षकांचे मन जिंकतात. अनेक दृश्यात संवाद नसताना देखील देविकाने तिच्या डोळ्यातून, हावभावतून केलेला अभिनय अप्रतिम आहे. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा खूपच चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. जाऊ दे न वं हे गाणे ऐकायला मस्त वाटते. सुधाकर यांची दिगदर्शन करण्याची पहिली वेळ आहे असे चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही. केवळ काही दृश्य चित्रपटात पुन्हा पुन्हा येत असल्याचे जाणवते. तसेच चित्रपट सुरुवातीला आणि शेवटाला जाताना थोडा संथ होतो. चित्रपटाचे संवाद देखील चांगले आहेत. चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने सगळ्या गोष्टी संपूर्णपणे उलगडून न सांगता कोणत्याही संवादाशिवाय चित्रपटाचा आशय लोकांपर्यंत पोहोचवला आहे. यासाठी दिग्दर्शकाचे करावे तितके कौतुक कमी आहे. हा शेवट मनाला नक्कीच भिडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu