गीत रामायणाच्या निमित्ताने …
महाकवी ग. दि. माडगुळकर यांचे शब्द आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे स्वर ,यांच्या संगमातून जन्माला आलेल्या गीत रामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवर सादर झाले त्याला १ एप्रिलला जवळ जवळ ६० वर्ष पूर्ण झाली.
पुणे आकाशवाणीवर ज्यावेळी गीत रामायणातील पहिले गाणे सदर झाले त्यावेळी ते गाणे श्रोत्यांच्या मनाला अशा काही त-हेने स्पर्शून गेले कि श्रोत्यांनी अक्षरश: रेडिओला हार घातले. असंख्य रेडिओंची घराघरातून देवाप्रमाणे पूजा झाली. जणू काही रामायणातील प्रसंग आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहतोय असा भास श्रोत्यांना व्हावा इतके सामर्थ्य त्या गाण्यात होते आणि का नसणार ? एक तर गीत रामायण ही गदिमांची अजोड रचना आणि त्याला लाभलेले बाबूजींचे अवीट गोडीचे सुरेल संगीत म्हणजे जणू काही दुग्धशर्करा योगच!
गीतरामायण हे रामायणातील ५ गीतांची केवळ रचना नसून शब्द – स्वर- भाव – उच्चार – माधुर्य या सर्वांचे अजोड मिश्रण आहे. गीत रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे यात रामायणातील अनेक पात्र आहेत. त्या त्या पात्राच्या भूमिकेत प्रवेश करून ती ती गीते बाबुजींनी अशा तर्हेने सदर केली आहेत कि त्या शब्द व स्वर रचनेचे सौंदर्य व सामर्थ्य श्रोत्यांना जगाच्या जागी खिळवून ठेवते.
गीत रामायणाची सुरुवात ज्या गाण्याने होते ते ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती ,कुश लव रामायण गती हे गाणे भूप रागात बांधले आहे. याशिवाय देसकार, यमन- कल्याण , भीमपलास, चान्द्रकस , भैरवी असे अनेक राग बाबुजींनी चाल देताना वापरले. अत्यंत कमी स्वरात स्वरविश्व उभ करण्याची बाबूजींची अजोड प्रतिभा गीत रामायणातील अनेक गाण्यांमध्ये दिसते. उदा. एका गाण्यातून असंख्य अपत्यहीन मातांचे दुख: कौसल्येच्या भूमिकेत शिरून अशा तर्हेने बाबुजींनी गाऊन व्यक्त केले आहे कि त्या असंख्य मातांना बाबूजी जणू काही आपलेच दुख: व्यक्त करत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नसेल.
गीतरामायणाच्या शेवटी रामाच्या सदगतीत (भारावलेल्या) झालेल्या अवस्थेचे वर्णन ‘सोडून आसन ,उठले राघव , उठुनी कवळती आपुले शैशव ,पुत्र भेटीचा घडे महोत्सव ,प्रभूचे लोचन पाणावती ‘ या गाण्यातून करताना बाबूजी असे काही देहभान हरपून गायले आहेत कि प्रभू रामचंद्रांबरोबर श्रोतेजनांचेही लोचन पाणावल्याशिवाय राहत नाहीत .
गीत रामायणाच्या प्रत्येक गाण्यातील गदिमांचा प्रत्येक शब्द आणि बाबुजींचा त्याला दिलेला सुरेल स्वर इतका भारदस्त व अवर्णनीय सोपा व मधुर आहे कि पहिल्यांदा ऐकाता क्षणीच प्रत्येक शब्द व सूर आपोआपच श्रोत्यांच्या हृदयाच्या संगणकात कायमचा दृढ केला जातो.
गेली ५ दशके व पुढचीही अनेक दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे व श्रोत्यांशी अतूट नाते जोडण्याचे सामर्थ्य या गीत रामायणात आहे.
बाबूजींच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती’ या गाण्याप्रमाणेच गदिमा व बाबूजी या दोन पाखरांनी श्रोत्यांच्या मनात गीत रामायणाच्या रूपाने कधीही न पुसल्या जाणारया स्मृती निर्माण केल्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद ! व शतश: प्रणाम .
– सौ. रश्मी उ. मावळंकर