‘झाले बहु होतील बहु परंतु यासम हा’-अमिताभ बच्चन ©मुकुंद कुलकर्णी

अमिताभ बच्चन ©मुकुंद कुलकर्णी

महानायक

डिजिटल बॅंकिंग मधील धोके सांगणारा , शाहरुख बरोबर जाहिरातीत तेवढ्याच उत्साहात धावणारा , नवीन चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारणारा , कौन बनेगा करोडपतीच्या झगझगीत मंचावर दमदार पावलं टाकीत मोठ्या आत्मविश्वासाने प्रवेश करणारा आपला लाडका महानायक आज ब्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करतो आहे , यावर त्याच्या देहबोलीकडे पाहिल्यावर विश्वास बसत नाही . रसिकांच्या मनात दडलेला हा अँग्री यंग मॅन आता तसा राहिला नाही खरा . आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या ज्ञानवृद्ध पितृतुल्य व्यक्तिमत्वासारखा तो अवतरतो . जराजर्जर अजिबात झालेला नसला तरी तो आता वृद्ध झाला आहे हे सत्यच . पिता हरिवंशराय यांचा सुसंस्कृत मुलगा हीच त्याची सांप्रत ओळख . संवेदनशील कवीचा हा मुलगा चित्रपटसृष्टीत उतरला नसता तर चांगला साहित्यिक नक्कीच झाला असता . हिंदी , इंग्रजी , उर्दू भाषांवर त्याचे प्रभुत्व आहे . वडिलांच्या बहुतेक कविता त्याला मुखोद्गत आहेत ! आपल्या वेल मॅनर्ड सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने तो प्रेक्षकांना जिंकून घेतो , आपलासा वाटतो . अनेक शारिरीक व्याधी संभाळत तो आज ही ज्या निष्ठेने आपल्या अभिनय सामर्थ्याला न्याय देतो आहे , ते केवळ कौतुकास्पद आहे . आजही तो पहिल्या एवढाच कार्यमग्न आहे . दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चेहरे हा चित्रपट याची साक्ष आहे . असाच धडधाकट आरोग्यसंपन्न अमिताभ पुढील अनेक वर्षे असेच रसिकांचे मनोरंजन करण्यास सक्षम राहो हीच प्रार्थना ! तुम जियो हजारो साल , साल के दिन हो पचास हजार !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभूतपूर्व चमत्कार म्हणजे महानायक अमिताभ बच्चन . आज हा महानायक 82 व्या वर्षात पदार्पण करतो आहे प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या पडद्यावरच्या रफ अँड टफ ‘ अँग्री यंग मॅन ‘ या प्रतिमेशी पूर्णपणे विसंगत मृदूभाषी , सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा महानायकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आरोग्य संपन्न जीवनाचे शतक साजरे होवो ही सदिच्छा !! जीवेत शरद: शतम् !!!

सुरुवातीला अमिताभ आजिबात क्लिक झाला नाही , सुपरस्टार राजेश खन्ना जेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत होता तेंव्हा हा कठोर चेहऱ्याचा हडकुळा वाटणारा युवक बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता . सणकी जानी राजकुमार याने जंजीर नाकारला आणि योगायोगाने तो बच्चनला मिळाला . पुढे सगळा इतिहासच घडला . गेम चेंजर ठरला हा चित्रपट . रोमँटिक बॉलिवूड हिरो ची इमेज त्याने अँग्री यंग मॅन अशी बदलून टाकली . त्याच्या केबीसी च्या भाषेत त्याने फ्लिप द क्वेश्चन , आलट पलट करून टाकली हिंदी चित्रपटसृष्टी . पण किरकोळ शरीरयष्टीचा हा युवक जेंव्हा शेट्टी सारख्या तगड्या पाच पंचवीस जणांना पडद्यावर लोळवायचा तेंव्हा ते हास्यास्पद वाटायचं . पण त्याच्या अभिनय क्षमतेचा स्पार्क कधीच लपला नाही . काळाच्या पुढे असायचा तो . कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम केवळ त्याच्या लोकप्रियतेमुळे जगभरात पॉप्युलर झाला . मुळात कार्यक्रम ज्ञानवृद्धी करणारा आहेच , त्यात पितृतुल्य व्यक्तिमत्वाचे बच्चन साहेब आपल्या सुसंस्कृत सूत्रसंचलनातून तो कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात . इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व विलक्षण आहे . महान कवी हरिवंश राय यांचा हा सुपुत्र आपल्या वडिलांच्या कविता सहजपणे उलगडून दाखवतो . बाबूजी आणि आई तेजी बच्चन यांच्याविषयी बोलताना भावूक होणारा हा नवयुवक केंव्हा आपला ताबा घेऊन जातो आपल्यालाच कळत नाही .

दि.11ऑक्टोबर 1942 रोजी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला . हिंदीतील सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांचे ते सुपुत्र हिंदू कायस्थ वडील आणि पंजाबी शीख मातेचे ते सुपुत्र . बच्चन खानदान हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच आहे . त्यांचे खरे आडनाव श्रीवास्तव . श्रीवास्तव मूळचे उत्तर प्रदेशातील राणीगंज येथील बाबूपट्टी या गावातले . हरीवंशराय बच्चन हे उदारमतवादी होते . जात पात या पलिकडे जाऊन ‘ वसुधैव कुटुंबकम् ‘ अशा विशाल दृष्टीकोनातून त्यांनी आपल्या ‘ श्रीवास्तव ‘ ह्या आडनावाचा त्याग करून ‘ बच्चन ‘ हे आडनाव स्वीकारले . ‘ बच्चन ‘ हे त्यांचे साहित्यातले टोपण नाव . श्रीवास्तव कुटुंबाने पुढे बच्चन हेच नाव स्वीकारले . भारतीय स्वातंत्र्यलढा तेंव्हा चरम पदावर होता . स्वातंत्र्याची पहाट दिसू लागली होती . ‘ इन्किलाब जिंदाबाद ‘ हा तेंव्हा स्वातंत्र्यलढ्याचा प्रेरक मंत्र होता . त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी बच्चन यांचे नाव

‘ इन्किलाब ‘ असे ठेवले होते . नंतर सुमित्रानंदन पंत या ज्येष्ठ कवींच्या सूचनेवरून त्यांनी मुलाचे नाव ‘ अमिताभ ‘ असे ठेवले . आमिताभ म्हणजे असा प्रकाश किंवा तेज , जे कधीही नष्ट होत नाही . हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभने आपले नाव सार्थ केले आहे .

सुमारे पाच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत बच्चन यांनी चित्रपट रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे . इ.स.1970 च्या दशकात प्रस्थापित ‘ सिस्टिम ‘ च्या अन्यायाच्या विरोधात हल्लाबोल करणाऱ्या मर्दानी

‘ अँग्री यंग मॅन ‘ चा तो प्रतिनिधी होता . अशा पद्धतीच्या भूमिका साकारत असतानाच आमिताभ आपल्या अष्टपैलू अभिनय सामर्थ्याची चुणुक दाखवत होता . त्याला मिळालेल्या निखळ विनोदी भूमिकासुद्धा तो तेवढ्याच सक्षमपणे सादर करत होता . बॉलीवूडमध्ये एक उत्कृष्ट ‘ सेन्स ऑफ ह्यूमर ‘ असलेला अभिनेता अशी त्याची इमेज होती .

अल्पावधीतच यशाच्या अत्युच्च शिखरावर विराजमान झालेल्या अमिताभने एक एंटरप्रेन्यूअर म्हणूनही काही काळ काम केले . छोट्या पडद्यावरचे ‘ मॅग्नेटिक ‘ व्यक्तीमत्व हे बिरुद तो आजही समर्थपणे मिरवत आहे .

आपल्या जवळजवळ पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी 180 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे . बेस्ट ॲक्टरच्या तीन नॅशनल ॲवार्ड्स व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत . देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराचे ते दोन वेळेस मानकरी आहेत . भारत सरकारने इ.स.1984 साली ‘ पद्मश्री ‘ आणि इ.स.2001 साली ‘ पद्मभूषण ‘ या सन्मानाने या महानायकाचा गौरव केला आहे . अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानाचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचेही मानकरी आहेत . Another feather in his cap !

समस्त भारतीयांच्या मनावर मोहिनी घालणारा बच्चन यांचा खर्जातील धीरगंभीर आवाज मृणाल सेन यांच्या ‘ भुवन शोम ‘ मध्ये पहिल्यांदा रसिकांच्या कानावर पडला . इ.स.1971 च्या ‘ सात हिंदोस्तानी ‘ या चित्रपटातून बच्चन यांनी सर्वप्रथम अभिनय क्षेत्रात पदार्पण केले . एका गंभीर सिनिकल युवकाचा हा रोल होता . तेंव्हा ‘ सुपरस्टार ‘ राजेश खन्ना याच्या हलक्या फुलक्या रोमँटिक भूमिकांच्या तुलनेत या विरुद्ध प्रकारच्या भूमिका रसिकांना आवडू लागल्या . परवाना , रेश्मा और शेरा अशा भूमिकांमधून बच्चन हळूहळू प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ लागला . ‘ गुड्डी ‘ या चित्रपटात आमिताभ पाहुणा कलाकार होता . या चित्रपटातील अतिशय गुणी , तरुण नायिका जया भादुरी नंतर बच्चनची धर्मपत्नी झाली .

सुरूवातीच्या चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवरील यश बच्चनला हुलकावण्या देत होते . इ.स.1973 च्या प्रकाश मेहरा यांच्या ‘ जंजीर ‘ या सिनेमाने ही कसर भरून काढली . प्रचंड यशस्वी ब्लॉकबस्टर होता ‘ जंजीर ‘ . त्यातला बच्चनचा रांगडा इन्स्पेक्टर विजय खन्ना प्रेक्षकांना जबरदस्त आवडला . कधीही उफाळून बाहेर पडेल असा त्याचा ‘ अँग्री यंग मॅन ‘ चा आविष्कार रसिकांना जवळचा वाटला . अन्यायी आणि उदासीन ‘ सिस्टिम ‘ च्या विरोधात उभा रहाणाऱ्या बंडखोर ‘ अँग्री यंग मॅन ‘ चा जन्म झाला . तो पर्यंतच्या रोमँटिक , भावूक अशा नायकांच्या प्रतिमेला छेद देणारा नवा रांगडा सुपरस्टार हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला . नंतरच्या काळात सुपरस्टार राजेश खन्नाला टक्कर देऊन त्याला मागे टाकणारा अभिनेता हिंदी चित्रपट सृष्टीला अमिताभच्या रुपात मिळाला . राजेश खन्नाबरोबर त्याचे ‘ आनंद ‘ आणि ‘ नमकहराम ‘ हे चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ‘ माईलस्टोन ‘ ठरले आहेत . दोघांनीही आपल्या अप्रतिम अभिनयाने या चित्रपटांचे सोने केले आहे . अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तो विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये चमकला . ‘ अभिमान ‘ मध्ये आपल्या पत्नीच्या गायन क्षेत्रातील वर्चस्वाचा हेवा करणाऱ्या गायकाची भूमिका , ‘ आनंद ‘मधील डॉ. भास्कर बॅनर्जी ऊर्फ बाबूमोशाय ,

‘ नमकहराम ‘ मध्ये आपल्या अन्यायी , भांडवलदार उद्योगपती बापाविरुद्ध बंड करणारा तडफदार युवक विकी . याच मध्यवर्ती कल्पनेच्या जवळ जाणारा ‘ शराबी ‘ मधील व्यसनाधीन पण जिंदादिल मद्यपी विकी कपूर अशा विविध छटा असलेल्या भूमिका त्याने समर्थपणे साकारल्या .

बॉक्स ऑफिसवर बच्चन यांचे चित्रपट चांगली कामगिरी पार पाडत होते . पण हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्या अर्थाने ‘ लीजंड ‘ म्हणून बच्चन यांचे स्थान इ.स.1975 साली प्रस्थापित झाले . इ.स.1975 हे बॉलिवूडच्या इतिहासातील महत्वाचं वर्ष होतं . त्यावर्षी महानायक अमिताभ यांचे दोन ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले . ‘ दीवार ‘ आणि ‘ शोले ‘ हे दोन्ही चित्रपट अमिताभच्या कारकीर्दीला एका निर्णायक टप्प्यावर , यशाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाणारे होते . ‘ दीवार ‘ ही दोन भावांची कथा . विजय एक गुन्हेगार , स्मगलर आणि रवी हा एक पोलिस अधिकारी . नैतिकतेचा पाठ देणारा हा एक क्लासिक चित्रपट होता . लहानपणी अनुभवलेले दारिद्रय आणि अवहेलना याचा सामना दोन भाऊ दोन वेगवेगळ्या प्रकाराने करतात . दांभिक समाजाशी बंडखोरपणे टक्कर देणारा ‘ अँग्री यंग मॅन ‘ अमिताभने साकारला होता .

त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ शोले ‘ या चित्रपटाने नवा इतिहास रचला . सर्वकालीन लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘ शोले ‘ चा उल्लेख करावा लागेल . मल्टिस्टार असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला . मुंबईतील मिनर्व्हा थिएटर मध्ये तब्बल साडेपाच वर्षे हाऊसफुल्ल चालण्याचा विक्रम या चित्रपटाने केला . या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटातील ‘ महानायक ‘ अशी बच्चन यांची प्रतिमा दृढ झाली .

शोलेच्या अभूतपूर्व यशानंतर अमिताभ यांनी पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या . इ.स.1977 सालच्या ‘ अमर अकबर अँथनी’ या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका , तसेच ‘ कभी कभी ‘ मधील रोमँटिक भूमिका तसेच , इ.स.1978 च्या ‘ डॉन ‘ मधील माफिया बॉस आणि त्याचा हमशकल विजय या दोन्ही भूमिका त्याने समर्थपणे पेलल्या . त्याची अष्टपैलू कारकीर्द सर्व बाजूंनी बहरत होती .

इ.स.1982 या वर्षी या महानायकाचा पुनर्जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही . ‘ कूली ‘ च्या सेटवर शूटिंग दरम्यान बच्चन गंभीर जखमी झाला . अमिताभ गंभीर अवस्थेत काही महिने हॉस्पिटलमध्ये होता . सबंध भारतभरात सहानुभूतीची लाट पसरली होती . देऊळ , प्रार्थनास्थळे येथे लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्या . परमेश्वराने या प्रार्थना ऐकल्या . आणि सर्वांचा लाडका अमिताभ या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडला . नंतर यथावकाश कूली चित्रपट पूर्ण झाला आणि तुफान यशस्वीही झाला .

इ.स.1984 साली राजीव गांधी यांच्या आग्रहावरून अमिताभने राजकारणात प्रवेश केला . आणि तिथेही त्याला अभूतपूर्व यश लाभले . काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्याने अलाहाबाद येथून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला . पण राजकारण was not his cup of tea . तीनच वर्षात त्याने राजीनामा दिला .

हळूहळू महानायक प्रौढ होत होता . त्याच्या अभिनय क्षमतेला न्याय देणाऱ्या भूमिका त्याला मिळत नव्हत्या . ऐंशीच्या दशकात एक

‘ शहेनशहा ‘ सोडला तर त्याचे इतर चित्रपट फारसे चालले नाहीत .

इ.स.1996 साली अमिताभ निर्माता , अभिनेता , यशस्वी उद्योजक अशा अनेक भूमिकांमध्ये दिसला . ‘ अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ‘ ची त्याने स्थापना केली . पण त्याचे हे धाडस फारसे यशस्वी ठरले नाही . दोन वर्षात अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन बंद पडले . तो कर्जबाजारी झाला . बँकांचे थकित कर्ज टाळण्यासाठी नादारीचा सोपा मार्ग न स्वीकारता परिस्थितीशी टक्कर देत त्याने कर्जाच्या सर्व रकमेची परतफेड केली . या काळात अभिनय क्षेत्रात ही तो फारशी चमक दाखवू शकला नाही .

इ.स.2000 सालापासून मात्र अमिताभने काळाची पावले ओळखून चरित्र अभिनेत्याचे रोल स्वीकारायला सुरूवात केली . आणि अभिनय क्षेत्रातील त्याच्या कारकीर्दीला नवी दिशा मिळाली . त्याच्या बुजुर्ग , अनुभवी , ज्येष्ठ , वयस्कर भूमिका प्रेक्षकांनी स्वीकारायला सुरूवात केली , आणि बच्चन हे पुन्हा चलनी नाणे झाले . मोहोब्बते , बागबान , ब्लॅक सारख्या चित्रपटांना उदंड प्रतिसाद लाभला . ‘ बागबान ‘ मध्ये हेमा मालिनी बरोबर त्याची केमिस्ट्री रसिकांना खूपच आवडली . बुजुर्ग पती पत्नीच्या भूमिका दोघांनीही अप्रतिम सादर केल्या . ‘ ब्लॅक ‘ चित्रपटाने बच्चनला ‘ नॅशनल फिल्म ॲवार्ड ‘ मिळवून दिले . त्याच्या सर्वोत्कृष्ठ अभिनय सामर्थ्याचे रहस्य त्याला एका मुलाखतीत विचारले असता , त्याचे उत्तर होते , ” It was instinctive and I did not use any acting techniques . I just enjoy working in films . “

त्याच्या आजवरच्या कारकीर्दीवर कळस चढवला तो ‘ कौन बनेगा करोडपती ‘ च्या

‘ होस्ट अँकरिंग ‘ ने ‘ हू वाँट्स टू बी अ मिलियॉनिअर ‘ ह्या ब्रिटिश शो चे हे देशी रुपांतर आहे . त्याच्या सुसंस्कृत आणि वेल मॅनर्ड व्यक्तीमत्वाने त्याला नवीन चाहतावर्ग मिळवून दिला . या कार्यक्रमातील त्याचा

‘ सॉफिस्टिकेटेड चार्म ‘ सर्व वयोगटातील तील प्रेक्षकांवर जादू करून गेला . आजही हा शो ‘ रन अवे सक्सेस ‘ ठरला आहे . दुसऱ्या कोणीही अशा प्रकारे सादर केलेला कार्यक्रम प्रेक्षकांना भावला नाही . ‘ झाले बहु होतील बहु परंतु यासम हा ‘ हेच खरे !

पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा हा अँग्री यंग मॅन खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच लढवय्या आहे . वाढतं वय आणि आरोग्याशी निगडीत अनेक समस्या असूनही हा माणूस सकारात्मक उर्जेचे मूर्तीमंत उदाहरण आहे . कोवीड 19 च्या वैश्विक महामारीच्या काळात जनजागृती करण्यासाठी सरकारच्या अनेक योजनांमध्ये या महानायकाने संपूर्ण सहयोग दिला . स्वतः , या संकटात सापडला . एकदा नाही तर दोनदा . पण , दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावर मात करून तो पुन्हा सक्रिय झाला . खरा कर्मयोगी आहे हा महानायक . आजही त्याचा केबीसी तेवढाच लोकप्रिय आहे . आजही तो बारा तास कार्यरत आहे . सकारात्मक उर्जेचा स्रोत असणाऱ्या या कर्मयोग्यास सलाम !

आज या महानायकाची एक ‘ फादर फिगर ‘ आणि हिंदी सिनेमाचा ‘ ब्रँड अंबॅसिडर ‘ अशी प्रतिमा जनमानसात रुढ आहे . एक नायक , सुपरस्टार म्हणून त्याचा काळ जरी मागे पडला असला तरी , नवीन मिडिया त्याने चांगलाच आत्मसात करून घेतला आहे . सोशल मिडियावर त्याचे करोडो फॅन्स आहेत . ट्विटरवर त्याच्या ब्लॉग पोस्ट फॉलो करणारे करोडो फॉलोअर्स आहेत . आपल्या कर्तृत्वावर ‘ लार्जर दॅन लाईफ ‘ झालेल्या या महानायकास विनम्र अभिवादन ! तुम जियो हजारो साल , सालके दिन हो पचास हजार !!

© मुकुंद कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu