नाटक रिव्यु : नाटक ऑल द बेस्ट 

ऑल टाइम दि बेस्ट असे….. ‘ऑल द बेस्ट’

मराठी विनोदी नाटकांच्या इतिहासातील  १९९०च्या दशकांत रंगमच गाजवणारं नाटक म्हणजे ‘ऑल द बेस्ट’. हजारो प्रयोग करुन प्रेक्षकांना हसवून त्यांचे आयुष्य वाढवणारं हे नाटक. मराठीतच नाही तर इतरही भाषांमध्ये या नाटकाने चार चांद लावले. खास बाब म्हणजे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित या नाटकातून रंगभूमीला भरत-अंकुश-संजय हे जबरदस्त विनोदी त्रिकूट लाभले. 

सध्याच्या काळात प्रेक्षकांच्या नाटकप्रतीच्या आवडीनिवडींमध्ये काळानुसार बदल झालेले दिसून येत आहेत. याचाच अंदाज घेऊन देवेंद्र   पेम यांनी ९० च्या दशकातील गाजलेलं ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक पुन्हा रंगमंच्यावर जीवनदान देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय यशस्वी होताना दिसून येत आहे. या नाटकमार्फत एक नवीन त्रिकुट मयुरेश पेम, विकास पाटील, मनमीत पेम रंगमंच्यावर धुमाकूळ घालताना दिसुन येत आहेत.

ऑल द बेस्ट च्या नाटकाची कथा ही तीन शारीरिक दृष्ट्या अपंग मित्रांच्या भोवताली फिरते. कथानकाचा मुख्य विषय हा मैत्री जिद्द आणि त्यावर मात करणारा मानवी उत्साह असा आहे. नाटकाचे कथानक हे विजय, चंद्रकांत आणि दिलीप या एका अपार्टमेंट मध्ये एकत्र राहणाऱ्या मित्रांच्या अवतीभवती फिरते आहे. यातील गमतीची बाब म्हणजे या तीन मित्रांमधील एक मित्र आंधळा, एक बहिरा आणि एक मूक आहे. ते तीनही मित्र एकाच मुलीच्या प्रेमात पडतात. मग काय त्या मुलीला प्रभावित करण्यासाठी व आपले अपंगत्व लपवण्यासाठी त्यांची चाललेली खिटपीट म्हणजे हे नाटक. 

नाटकातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर चंद्रकांत म्हणजेच चँग हे पात्र मनमीत पेम याने साकारले आहे.  हे पात्र कर्णबधिर असल्यामुळे या पात्राने आपल्या हावभावांच्या माध्यमातून अत्यंत हुशारीने हे पात्र साकारले आहे. स्वतःला ऐकू न येता ही चंद्रकांत इतर पात्रांबरोबर साधत असलेल्या संवादाच्या गैरसमजांमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे विनोद निर्मिती होते. 

मूकबधीर दिलीपचे पात्र  मयूरेश पेम याने साकारले आहे,  हे पात्र मूकबधीर असल्याने पात्राला संवाद साधण्यासाठी शारीरिक विनोदावर अवलंबून राहावे लागते यासाठी या पात्राचे हावभाव इशारे आणि त्याची शारीरिक हालचाल या सर्व गोष्टींचा विनोद निर्मितीसाठी छान वापर या कलाकाराकडून केला गेला आहे. दिलीप चे हे पात्र नाटकाला कधी कधी भावनिक स्तरावर उंचावर नेते कारण त्याचे मन हे शब्दांपेक्षा जास्त बोलके आहे. म्हणूनच या पात्राचा अभिनय विनोदी आणि संवेदनशील असा दोन्ही आहे. 

विजय हे एका आंधळ्याचे पात्र या नाटकात दिसून येते. या पात्राच्या सादरीकरणात नाजूकता आणि आत्मविश्वास यांचे अचूक मिश्रण दिसून येते. विजयचे पात्र साकारणाऱ्या विकास पाटीलने पात्राच्या अतिशय सूक्ष्म सूक्ष्म बारकाव्यांना टिपले आहे. आणि त्याचे संवादाचे सादरीकरणसुद्धा प्रभावी आहे.

मोहिनी हे पात्र साकारणारी कलाकार रिचा अग्निहोत्री हीने पात्रला पुरेपूर न्याय दिला आहे. निरागस, सोज्वळ पण तितकीच हुशार अणि तिक्ष्ण अशी काहीशी तिची भूमिका आहे. 

नाटकातील कलाकारांनी त्यांच्या अभिनय सादरीकरणातूनच नाही तर नृत्यसादरीकरणातून देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. 

ऑल द बेस्ट या नाटकाचे  दिग्दर्शन हे नाटकाच्या गतीला कायम ठेवत आणि विविध प्रसंगांनी फुलवत केले गेले आहे त्यामुळे ओढून ताणून विनोद आणला आहे असे दिग्दर्शकाने कुठेही जाणवू दिलेली नाही. आणि यातच नाटकाच्या दिग्दर्शनाचे मोठे यश आहे. कलाकारांची हालचाल त्यांचे हावभाव आणि त्यांचे संवाद या सर्वांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण समन्वयता आढळते. आणि नाटकातील शारीरिक विनोद सुद्धा अत्यंत कौशल्याने हाताळला गेला आहे त्यामुळे तो सुद्धा कुठे खटकत नाही. 

नाटकाचे निर्मितीसाठी चे बजेट हे तसे पाहिले असता अत्यंत कमी आहे, परंतु कथा सजीव करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्याच्यावर अगदी अचूकतेने लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. नाटकाच्या नैपथ्याबद्दल बोलायचे झाले तर, अपार्टमेंटचा सेट जिथे बहुतेक प्रसंग घडतात तो साधारण पण प्रभावी आहे. कलाकारांना मुक्तपणे हालचाल करण्याच्या आणि विनोद निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून सेटची बांधणी केली आहे.  सोबतच विविध वस्तूंचा वापर सुद्धा चालाखीने केला गेला आहे. त्याचबरोवर नाटकाची ध्वनी योजना आणि प्रकाश योजना नाटकात एक जिवंतपणा आणते. 

नाटकाचे सशक्त स्थान हे याचे संवाद आणि लेखन हे आहे. नाटकाचे लेखन हे कल्पकतेने आणि हुशारीने केलेले आहे, तर नाटकाचे संवाद हे अत्यंत खुसखुशीत असे आहेत प्रत्येक ओळ ही जणूकाही खूप काळजी घेऊन तयार केली आहे असे वाटते. नाटकातील विनोद हा मुख्यता परिस्थितीजन्य आहे. नाटकाच्या लेखनामध्ये जितके विनोदाचे क्षण आहेत तितकीच प्रामाणिकता सुद्धा आहे असे वाटते. हे नाटक जरी एक विनोदी नाटक असले तरी ते मैत्रीनिष्ठा आणि विपरीत परिस्थितींवर मात करणारे माणसाची क्षमता अशा विषयांवर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. 

ऑल द बेस्ट हे एक असे नाटक आहे जे अनेक वेळा वेगवेगळ्या अभिनेत्यांनी रंगमंचावर सादर केले आहे मात्र तरी नाटकाचा जो सारांश आहे तो तसाच टिकवून ठेवला आहे. आणि प्रेक्षकांशी या नाटकाची असणारी भावनिक गुंतवणूक ही सुद्धा तितकीच प्रामाणिक पाहायला मिळते. 

या नाटकाच्या यशाचे श्रेय हे विषयाच्या मांडणीला आणि लोकांबरोबर असणाऱ्या भावनिक गुंतवणुकीला दिले जाऊ शकते. या नाटकाला मराठी रंगभूमीवर एक महत्त्वाचे स्थान आहे आणि विविध प्रसंगी मराठी रंगभूमीवर चर्चा करताना या नाटकाचा संदर्भ आजदेखील दिला जातो. एखाद्या कलेमध्ये अपंगत्वाचे प्रतिनिधित्व कसे केले जाते याचे हे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे नाटक आहे.

या नाटकाचे विविध भाषांमधून आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून सादरीकरण झाले आहे यात सुद्धा या नाटकाचे यश दिसून येते. फक्त रंगभूमी नाही तर टेलिव्हिजन किंवा चित्रपटांमधून सुद्धा या नाटकाचे माध्यमांतर झालेले दिसते. याचे संपूर्ण श्रेय हे  या नाटकाचे लेखक- दिग्दर्शक देवेंद्र पेम यांना जाते यात तिळमात्रही शंका नाही. नाटकाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडणारे असे या नाटकाचे लेखन आहे. स्लापस्टिक कॉमेडी या बाजाला नाटकात पुरेपूर न्याय दिलेला पाहायला मिळतो. दोन पिढ्यांचे लोकप्रिय ऑल टाइम दि बेस्ट असे ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक सध्याच्या धकाधकीच्या आणि स्ट्रेसफुल जीवनावर अगदी रामबाण उपाय आहे.  

Review by- Sayali Angawalkar

लेख-दिग्दर्शक : देवेंद्र पेम 

कलाकार: 

मयूरेश पेम

विकास पाटील 

मनमीत पेम 

रिचा अग्निहोत्री 

नेपाठ्य- प्रदिप पाटील

प्रकाशयोजना – शितल तळपदे

म्यूजिक – वेदांत जोग

वेशभूषा – चैत्राली डोंगरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu