नाटक समिक्षण -जर तरची गोष्ट!
जर-तरच्या कोड्यात अडकलेली एक विलक्षण प्रेमकहाणी..
अलीकडे “तरुण पिढीने नाटकाकडे पाठ फिरवली आहे” असे कायम कानावर पडत होते. अर्थात, काही अंशी त्यात तथ्य देखील आहे. त्यामुळेच हल्ली बरीच नाटकं तरूण पिढीला आकर्षिक करतील आणि त्यांना जवळची वाटतील अशा विषयांवर सादर होत आहेत. असेच एक नाटक तरूण प्रेक्षकवर्गाला नाट्यगृहात खेचून आणण्यात आणि त्यांच्यात नाटकाची गोडी निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. तरुणाईला नाटकाकडे वळवायचे असेल तर काळानुसार नाटकाच्या विषयांमध्येही नाविन्य आणि समर्पकता आणली पाहिजे; हा एकमेव विचार मनाशी बाळगत सातत्याने ‘हाऊसफुल’चे मानकरी ठरत असणारे नाटक म्हणजे ‘जर तरची गोष्ट!’
अद्वैत दादरकर आणि रणजीत पाटील दिग्दर्शित ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत या कलाकारांंबरोबरच आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय यांच्याही मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक अद्वैत दादरकरबरोबर अभिनेता उमेश कामत आणि आशुतोष गोखले हे समीकरण या आधीही “दादा एक गुड न्यूज आहे!” या नाटकात पाहायला मिळाले होते. त्यामुळे या नाटकातही या कलाकारांची आपसात जमलेली भट्टी प्रकर्षाने जाणवते.
अद्वैत दादरकर याने अतिशय प्रशंसनीय असे दिग्दर्शनाचे कार्य केले आहे. मुळात एखाद्या कथेला फुलवण्याचे कार्य दिग्दर्शकाकडे असते, मात्र कथानकात एकापेक्षा जास्त ट्रॅक असताना ते कथानक गुंफून ठेवण्याची जबाबदारी ही दिग्दर्शकाकडे येते. ती जबाबदारी अद्वैत दादरकरने लीलया पार पाडली आहे. नंदू कदम हे या नाटकाचे निर्माते आहेत; तर इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून हे नाटक बांधले गेले आहे.
या नाटकाचे मुख्य आकर्षण ठरली आहे ती म्हणजे, महाराष्ट्राची लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत. मराठी मनोरंजनसृष्टीत या जोडीने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत, प्रचंड प्रेम कमावले आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने प्रिया-उमेश तब्बल १० वर्षांनी एका नव्या कलाकृतीसह एकत्र रंगमंचावर झळकत आहेत. सध्या या नाटकाला मिळणाऱ्या रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाचे हे नक्कीच एक मोठे कारण म्हणता येईल.
हे नाटक म्हणजे राधा (प्रिया बापट) आणि समर (उमेश कामत) यांची आजच्या काळातील तरुणाईला आपलीशी वाटेल अशी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडप्याचा लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट होतो. एवढेच नाही तर आता या दोघांनाही अबीर (आशुतोष गोखले) आणि सती (पल्लवी अजय) हे नवे जोडीदारदेखील भेटले आहेत. अशातच एकदा फिरायला गेले असताना अलिबागच्या एका रिसॉर्टवर ही दोन्ही जोडपी अचानक एकमेकांसमोर येतात. त्यानंतर तेथे काय घडते?…राधा-समरच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय?.. हीच या नाटकाची खरी गंमत आहे.
कौतुकाची गोष्ट म्हणजे नाटकाचा विषय जरी तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात आला असला तरी; नाटकाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे.
राधा आणि समरची लव्ह-हेट रिलेशनशिप केमिस्ट्री कधी हसवणारी तर कधी मनाला भावणारी आहे. अभिनेता आशुतोष गोखले याने साकारलेली राधाच्या नव्या जोडीदाराची म्हणजेच ‘अबीर’ची भूमिका लक्षवेधी आहे. अबीर हा एक निरागस, वेंधळा, काहीसा बालिश परंतु तरीही अत्यंत प्रेमळ स्वभावाचा मुलगा आहे. तर समरची सध्याची गर्लफ्रेंड सती ही एक बोल्ड आणि बिनधास्त मुलगी आहे.
सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य तो न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. परंतु काही प्रसंगी कलाकारांच्या विनोद शैलीतील उणिवा दिसून येतात. संवादांमध्ये थोडी अधिक कल्पकता आणि सहजता येऊ शकली असती असे जाणवले. उत्तरार्धानंतर नाटकाची कथा फार संथ गतीने पुढे जाते. त्यामुळे नाटकाचा विषय थोडा भरकटल्यासारखा वाटतो. त्यावेळी आशुतोष आणि पल्लवी यांच्या हलक्या-फुलक्या भूमिकांनी नाटकातील जिवंतपणा टिकवून ठेवला आहे.
उत्तरार्धातील राधा आणि सतीचा समुद्रकिनाऱ्यावरील एक सीन विशेष लक्षवेधी ठरतो. त्या दोघींमधील निखळ संवाद आणि त्यातून देण्यात आलेला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. उत्तम प्रकाशयोजनेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील एक चांदणी रात्र रंगमंचावर हुबेहुब साकारण्यात आली आहे.
प्रियाने गायलेल्या सुमधुर गाण्यांनी नाटकात एक वेगळीच रंगत आणली आहे. या नाटकातील ‘जर तरची गोष्ट’ हे गाणं तर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत आहे.
श्रीनाथ म्हात्रे याचे पार्श्वसंगीत, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना तसेच संदेश बेंद्रे यांचे कला दिग्दर्शन आणि नेमके नेपथ्य नाटकाची शोभा वाढवतात. नेपथ्यातील नेमकेपणा आणि प्रकाश योजनेचा प्रभावी वापर करून एक जिव्हाळ्याचे वातावरण तयार करण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. यामुळे पात्रांच्या भावनिक कोंडीकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. श्वेता बापट यांनी साजेशा वेशभूषेतून पात्रांची एकूणच पार्श्वभूमी आणि जीवनशैली उत्तमप्रकारे अधोरेखित केली आहे.
इरावती कर्णिक यांचे लेखन हे थोडेसे तात्विक पद्धतीचे दिसून येते आणि त्यामुळे प्रेक्षक आत्ममंथन करू लागतात. समोर सादर होणाऱ्या विषयाबद्दल प्रेक्षक सखोल विचार करायला लागतात. मात्र त्याचबरोबर लेखनामध्ये गंभीर विषय सुद्धा विनोदात्मक पद्धतीने मांडून एक प्रकारचा समतोल साधला गेला आहे. त्यामुळे मेंदूला चालना देणारे हे नाटक मनोरंजक सुद्धा झाले आहे. लेखिकेने संहीता लिहिताना प्रत्येका पात्राला दिलेली एक वेगळी छटा चांगलीच उठून दिसते. तरुणाईचे बदलत्या काळाप्रमाणे बदलत जाणारे विचार, त्यांची मानसिकता आणि गोष्टींकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन ज्या सहजतेने प्रेक्षकांसमोर मांडला आहे त्याचे कौतुक करावेसे वाटते. महत्त्वाचे म्हणजे लेखिकेने नाटकातून प्रेक्षकांना कोणताही थेट उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु तरीही कथेतून प्रेक्षकांना नकळतपणे बऱ्याच गोष्टी उलगडतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-गौरवी तेली